Thursday, November 22, 2007

"ती"

हे काही व्यक्तिचित्र नव्हे तर ह्या आहेत प्रकट झालेल्या भावना. ’ती’ कोण, नाव गाव काय असे प्रश्ण इथे गौण आहेत. थोड्याफ़ार प्रयत्नाने कोणालाही ह्यातले ’गुप्त’ details कळू शकतिल. पण ते उघड झाले तरी बिघडत काहीच नाही. माझ्या ह्या भावना प्रामाणिक आहेत ना एवढेच महत्त्वाचे.

तशी तिची आणि माझी ओळख उशिरानेच झाली. ती एक प्रसिद्ध लेखिका असली तरी मी त्या लिखाणाच्या वाटेला कधीच गेलो नव्हतो. म्हणजे तेव्हाचे माझे वय आणि आवडी बघता तसे काही पुस्तक उचलणे मी शक्यच नव्हते. लेखनाबरोबरच तिने स्त्रियांचे काही उपक्रम, आकाशवाणी आणि दूरदर्शन वरील काही कार्यक्रमात सहभाग दिला होता.


इथे एका स्नेह्याकडे गप्पांचा कार्यक्रम होता तेव्हा तिच्याशी पहिली भेट. तिच्या पतीबरोबर आलेली ती. पहिल्या भेटीतच एक हसरेपणा जाणवला तिच्या व्यक्तिमत्वात पण त्यापलिकडे काहीच नाही. तिचे यजमान म्हणजे दिसायला अगदी युरोपियन साहेब. उंच, गोरे, घारे आणि विचारांत एक प्रकारचा ठामपणा. म्हणजे हटवादीपणा नव्हे तर आपण काय बोलतो आहोत ह्याची पूर्ण जाणिव.


कशी कोण जाणे गप्पांची गाडी पु. लं. वर येउन पोचली आणि तीच्या यजमानांनी एक विधान केले " पु. लं. ना काही मी विचारवंत वगैरे मानत नाही....". झालं. आमच्या पु. ल. प्रेमाला पहिली ठेच बसली. त्यावेळी वयाची एवढी परिपक्वता नव्हती आणि त्यांच्या स्वभावाशीही परिचय नव्हता. मी माझ्या (नेहेमीच्या) सवयीने उसळून त्यांना म्हणालो "कशावरुन.....". बहुतेक एखाद्या व्यक्तीची अशी प्रतिक्रिया त्यांना अपेक्षितच असावी. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कटुता न निर्माण होता चर्चा पुढे चालू राहीली. त्यावेळी ती आतमधे गृहस्वामिनीबरोबर स्वैपाकचे बघत होती. म्हणून तिची मते कळू शकली नाहीत. पण त्या दिवशीच्या गप्पांमधून त्या उभयतांशी वैयक्तिक परिचय होण्याइतपत मैत्री झाली.

पुढे तिच्या संदर्भात अधिक माहिती मिळत गेली. एका असाध्य आजाराशी तीने दिलेल्या यशस्वी सामन्याशी हकिकत कळल्यावर तर आदर आणि कुतूहल अधिकच वाढले. त्यात एका दिवशी तीच्या घरचे आम्हाला आणि त्या स्नेह्यांना बोलावणे आले. काही कारणामुळे स्नेही येउ शकत नव्हते म्हणुन मग आमच्याच मनमोकळ्या गप्पा झाल्या. लक्षात आले - व्यक्तिमत्व जबरदस्त आहे, अर्थात यजमानही तोडीसतोड होते. पण तरी एक प्रकारची ऋजुता होती दोघांच्याही वागण्या बोलण्यात. ते दोघे केव्हा आमचे ’काका मावशी’ झाले ते कळलेच नाही.

त्या दिवशीच्या भेटीने ऋणानुबंध जुळले त्याला अजून एक (स्वार्थी) कारण म्हणजे - तीच्या कडे असलेला असंख्य पुस्तकांचा साठा. मराठी इंग्रजी दोन्ही पण मी लगेच त्यातली काही मराठी पुस्तके उचलून आणली. अतिशय वेगवेगळ्या विषयांची पुस्तके - म्हणजे लेखक, विषय, प्रकाशन साल - नेमके नाव महिती नसेल तर मिळूही शकणार नाहीत अशी. प्रविण पाटकरांचे ’सति’, सदा कर्‍हाड्यांचे "जेव्हा मी जात चोरली होती", एक समिक्षे वरचे पुस्तक. (’सति’ बद्दल वेगळा लेख लिहावा इतके वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे ते...). माझ्या आत्तापर्यंतच्या चाकोरीबद्ध वाचनाला एक वेगळीच दिशा, दृष्टी मिळाली. ह्यातली बरीच पुस्तके तिला प्रत्यक्ष लेखकांनी भेट म्हणून, अभिप्रायार्थ, स्वाक्षरी करुन दिलेली होती. तिच्याबरोबर आपले जुळणार ह्याची खुण गाठ तिथेच पक्की झाली.

(क्रमशः)

Thursday, November 8, 2007

भारत आणि पाकिस्तान

एकाच दिवशी स्वतंत्र झालेले दोन देश. एक आज ’प्रगतीच्या अधिकच उच्च पथावर’ आहे तर दुसरा हुकूमशाहीच्या गर्तेत. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांचे नशिब जसे वेगवेगळे निघावे त्यातलाच हा प्रकार.

मला स्वत:ला ’नेते’ हा प्रकार अजिबात आवडत नाही. देशाच्या ’ह्या’ अवस्थेला जबाबदार हि नेते मंडळीच असतात. पण पाकिस्तान कडे बघितल्यावर आपल्याकडचे नेतेही कितीतरी चांगले वाटू लागतात. हा पाकिस्तानचा ’सर्वेसर्वा’ म्हणजे विरोधाभासाचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. आधी पंतप्रधानाला पदच्युत करुन सत्ता बळकवायची, मग एकीकडे लष्करी गणवेष उतरुन ठेवतो म्हणत निवडणुका घोषित करायच्या आणि मग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात जाइल ह्याची कल्पना येताच ’आणिबाणि’ जाहिर करायची. मस्त रे कांबळे :)

मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं - आपल्या वागण्यातली एवढी मोठी विसंगती ह्यांच्या लक्षात कशी येत नाही ? का ह्यांची कातडी इतकी जाड आहे ? आणि लोकांचे काय ? त्यांना कळते की नाही हे ? का लोक आपली रोजीरोटी मिळवण्यातच इतके गुंतलेले आहेत की ह्या गोष्टी दिसून सुद्धा त्यांना त्याबाबतीत काहीही करावेसे वाटत नाही ? का एवढी दहशत आहे ?

भारतात बाकी काहीही असले तरी (कुठल्याही गोष्टीवर) आपले मत व्यक्त करायची मुभा आहे आणि लोकं ते करतात सुद्धा. एखाद्या शहरातले लोक इतरांपेक्षा ही सुविधा जास्त वापरत असतील :) पण अगदी कोणावरही टीका होते आणि कशाही भाषेत होउ शकते. टीकाकारांची मुस्कटदाबी झाल्याचे अजूनतरी वाचनात आले नाही. भारतातही आणिबाणिचा प्रयोग एकदा झाला होता. त्यावेळेची परिस्थिती निराळी होती असे कदाचित म्हणता येईल. पण सर्व थरांतून त्या आणिबाणिला विरोध झाला होता. साहित्यिक, कवी, एवढेच नव्हे तर सर्व सामान्य जनताही रस्त्यावर उतरुन निषेधाच्या घोषणा देत होती. देशाच्या सुदैवानी इंदिराजींना लवकर सुबुद्धी सुचली आणि ते काळे पर्व संपले.

ह्या पाकिस्तानच्या बाबतीत ’ज्याचे त्याचे नशिब’ - असे म्हणून मोकळे होता येईलही कदाचित पण ह्या सगळ्या अस्थिरतेचा भारतावर काय परिणाम होणार आहे ह्याचा विचार ? भारताचे सगळे शेजारी आज कुठल्यातरी (बहुतकरुन हुकूमशाहीच्याच) आवर्तात सापडलेले दिसतायत. पाकिस्तान मधे ही कथा, ब्रह्मदेशात तेच, श्रीलंकेत वांशिक हिंसाचार, नेपाळ मधे राजेशाही चे तमाशे, बांगलादेशातली राजकीय अस्थिरता... ह्या सगळ्याचे गंभिर परिणाम आज ना उद्या भारतावर होणारच आहेत, कशा प्रकारे ’द्दृग्गोच्चर’ होतात एवढेच कळायचे बाकी आहे.

असो
शुभ दीपावली सर्वांना....

Thursday, November 1, 2007

नविन पुस्तके

सध्या २-३ पुस्तके एकदम वाचतो आहे. एक म्हणजे बरेच दिवस वाचायच ठरविलेल डॉ. रवि बापट ह्यांच "वॉर्ड नं ५" आणि दुसरं एक इंग्रजी Carpet Wars
बापटांच्या पुस्तकाविषयी विशेष वाटण्याचे कारण म्हणजे बापट आमच्या लांबच्या नात्यातले - म्हणजे त्यांच्याशी थोडाफ़ार परिचय झालेला. अर्थात ते वयाने आणि अधिकारानेही मोठेच त्यामुळे फार जवळिक झाली नाही पण माणूस आवडला अणि शिवाय ते एक प्रथितयश डॉक्टर. दोन्हीमुळे पुस्तकाबद्दल उत्सुकता होतीच आणि अजिबात निराशा झाली नाही. पुस्तकात खळबळजनक काही नसले तरी त्यांचे अनुभव मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. KEM मधे काम करताना आलेले रुग्णांचे, आजारांचे आणि परिस्थितीचे वैचित्र्यपूर्ण अनुभव साध्या सोप्या ओघवत्या भाषेत मांडले आहेत. वेगळ्या विषयावरचे वाचनिय पुस्तक...

Carpet wars बद्दल उद्या....