एकाच दिवशी स्वतंत्र झालेले दोन देश. एक आज ’प्रगतीच्या अधिकच उच्च पथावर’ आहे तर दुसरा हुकूमशाहीच्या गर्तेत. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांचे नशिब जसे वेगवेगळे निघावे त्यातलाच हा प्रकार.
मला स्वत:ला ’नेते’ हा प्रकार अजिबात आवडत नाही. देशाच्या ’ह्या’ अवस्थेला जबाबदार हि नेते मंडळीच असतात. पण पाकिस्तान कडे बघितल्यावर आपल्याकडचे नेतेही कितीतरी चांगले वाटू लागतात. हा पाकिस्तानचा ’सर्वेसर्वा’ म्हणजे विरोधाभासाचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. आधी पंतप्रधानाला पदच्युत करुन सत्ता बळकवायची, मग एकीकडे लष्करी गणवेष उतरुन ठेवतो म्हणत निवडणुका घोषित करायच्या आणि मग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात जाइल ह्याची कल्पना येताच ’आणिबाणि’ जाहिर करायची. मस्त रे कांबळे :)
मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं - आपल्या वागण्यातली एवढी मोठी विसंगती ह्यांच्या लक्षात कशी येत नाही ? का ह्यांची कातडी इतकी जाड आहे ? आणि लोकांचे काय ? त्यांना कळते की नाही हे ? का लोक आपली रोजीरोटी मिळवण्यातच इतके गुंतलेले आहेत की ह्या गोष्टी दिसून सुद्धा त्यांना त्याबाबतीत काहीही करावेसे वाटत नाही ? का एवढी दहशत आहे ?
भारतात बाकी काहीही असले तरी (कुठल्याही गोष्टीवर) आपले मत व्यक्त करायची मुभा आहे आणि लोकं ते करतात सुद्धा. एखाद्या शहरातले लोक इतरांपेक्षा ही सुविधा जास्त वापरत असतील :) पण अगदी कोणावरही टीका होते आणि कशाही भाषेत होउ शकते. टीकाकारांची मुस्कटदाबी झाल्याचे अजूनतरी वाचनात आले नाही. भारतातही आणिबाणिचा प्रयोग एकदा झाला होता. त्यावेळेची परिस्थिती निराळी होती असे कदाचित म्हणता येईल. पण सर्व थरांतून त्या आणिबाणिला विरोध झाला होता. साहित्यिक, कवी, एवढेच नव्हे तर सर्व सामान्य जनताही रस्त्यावर उतरुन निषेधाच्या घोषणा देत होती. देशाच्या सुदैवानी इंदिराजींना लवकर सुबुद्धी सुचली आणि ते काळे पर्व संपले.
ह्या पाकिस्तानच्या बाबतीत ’ज्याचे त्याचे नशिब’ - असे म्हणून मोकळे होता येईलही कदाचित पण ह्या सगळ्या अस्थिरतेचा भारतावर काय परिणाम होणार आहे ह्याचा विचार ? भारताचे सगळे शेजारी आज कुठल्यातरी (बहुतकरुन हुकूमशाहीच्याच) आवर्तात सापडलेले दिसतायत. पाकिस्तान मधे ही कथा, ब्रह्मदेशात तेच, श्रीलंकेत वांशिक हिंसाचार, नेपाळ मधे राजेशाही चे तमाशे, बांगलादेशातली राजकीय अस्थिरता... ह्या सगळ्याचे गंभिर परिणाम आज ना उद्या भारतावर होणारच आहेत, कशा प्रकारे ’द्दृग्गोच्चर’ होतात एवढेच कळायचे बाकी आहे.
असो
शुभ दीपावली सर्वांना....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment