'क्रोम'
गुगलनी 'क्रोम' ची घोषणा केली आणि एकच हलचल माजवली. कुणाला वाटले की हा हल्ला मायक्रोसॉफ्ट वर आहे त्यांच्या OS चा वाटा कमी करण्यासाठी तर कुणाला वाटले आता अॅप्लिकेशन्स नंतरची गुगलची ही नवी खेळी आहे data वर कब्जा करण्याची. गुगलने इतकी कमी माहिती (म्हणजे जवळ जवळ नाहीच) उपलब्ध केलेली आहे 'क्रोम' बद्दल की शंकाकुशंकांना नुसते उधाण आले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क लढवून काहीतरी विचार मांडतो आहे मग आम्ही तरी त्याला अपवाद कसे असणार ? :)
गुगलने सांगितले की ही प्रणाली 'नेटबुक' म्हणजे कमी शक्तीच्या पण अत्यंत हलक्या आणि प्रामुख्याने प्रवासात वापरल्या जाणार्या वैयक्तिक संगणकांसाठी आहे. आता हे संगणक प्रवासातील प्रामुख्याने ई-मेल, चॅट, फोटो, ईंटरनेट ह्यासाठी उपयोगी पडतात. अर्थात त्यांच्यावर इतरही कामे करता येउ शकतील पण त्यांची शक्ती मुळात मर्यादितच असते. (ती तशी मर्यादित असण्याचे प्रमुख कारण म्हणजे वजनाला हलके आणि बराच जास्त वेळ चालणारी बॅटरी). आता अशा संगणकांमधे सध्यातरी XP ही प्रमुख आहे. एवढ्या कमी शक्तीच्या संगणकावर Vista चालणे महा-मुश्किल आणि Linux अजूनही सर्व-सामान्यांच्या पचनी पडलेली नाही - त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे प्राबल्य अधिक आहे. आता अशा परिस्थितीत गुगलने ह्या 'क्रोम' प्रणालीची घोषणा करताना सांगितले की 'नेटबुक' वर वापरण्याकरिता (प्रामुख्याने) ही बनविली जात आहे. पण नेमकी काय आहे ते अजून गुलदस्त्यातच आहे.
आता हे 'सिक्रेट' शोधून काढण्यासाठी थोडा विचार करुया. गुगलच्या अजून काय सेवा आहेत ? ई-मेल, डोक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, फोटो (पिकासा), व्हिडियो (YouTube), मॅप्स, कोड (apps). ह्या सगळ्या सेवांमधे वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स साठवायची सुविधा आहे. ई-मेल मधे 7GB आणि पिकासामधे 1GB आणि इतर अशा मिळून साधारण 10GB जागा मोफत मिळते आहे. आता ह्या सगळ्या सेवा कशा चालतात ? म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या कॅमेर्यामधून थेट गूगलकडे जात नाहीत. तुम्ही तुमच्या संगणकावर (hard drive) आधी ते उतरवून घेता आणि मग एक किंवा अनेक गुगलवर चढवता. म्हणजे तुमचा संगणक (आणि hard drive) एका मध्यस्थाचे काम करतो. आणि तुम्हाला मुद्दाम गुगलवर त्या फाईल्स चढवाव्या लागतात. तर माझा असा कयास आहे की 'क्रोम' हा 'मध्यस्थ' बनायच्या विचारात आहे.
म्हणजे थोड उलगडून सांगायच झाल तर - तुमच्या संगणकामधे काही फोल्डर्स आणि त्यात फाईल्स असतात. हे फोल्डर्स तुमच्या संगणकाच्या hard drive मधे साठविलेले असतात. क्रोम मधे 'ही hard drive' ची जागा गुगल घेणार असे मला वाटते आहे. म्हणजे तुम्ही तुमचे सदस्यनाव वगैरे दिलेत (आणि इंटरनेट जोडले असेल) की तुमच्या संगणकावर जे फोल्डर्स आणि फाईल्स दिसू लागतील ते प्रत्यक्षात साठविलेले असतील गुगलच्या स्टोरेजमधे. तिथून ती फाईल 'डाउनलोड' करुन तुमच्याच संगणकावर आहे असा आभास उत्पन्न केला जाईल. म्हणजे वापरकर्त्याच्या दृष्टीने काहीच वेगळे नसणार पण फाईलची साठवणूक मात्र 'क्लाउड' मधे (दुसरीकडेच कुठेतरी) - म्हणजे दुसर्या संगणकावरुन सुद्धा तुम्हाला त्याच सदस्यनावाने सगळ्या फाईल्स हाताळता येउ शकतील. संचालन प्रणाली (OS) हे सर्व तुमच्या नकळत घडवून आणेल.
आता प्रश्न येईल की ईटरनेट जोडणी नसेल तेव्हा ? पण त्यासाठी तुमच्याकडे hard drive असणे अपेक्षित आहे. (अर्थात संचालन प्रणाली OS चढवायची असेल (install) तर हार्ड ड्राईव्ह असायलाच हवी पण मग 'off-line' मोड मधे ही प्रणाली काम करेल असा माझा तर्क आहे. म्हणजे जेव्हा जाल जोडणी नसेल तेव्हा तुमच्या हार्ड ड्राईव्ह वर सर्व माहिती राहील आणि जाल जोडणी झाली की सर्व काही Sync केले जाईल 'क्लाऊड' मधल्या साठ्याबरोबर. म्हणजे परत तुम्ही तुमच्या सगळ्या फाईल्स कुठूनही हाताळायला मोकळे. :)
हे सर्व तर उत्तम आहे, पण ह्यात गुगलसाठी काय फायदा ? मला दोन फायदे दिसतात. एक म्हणजे Spread - जेवढे जास्त लोक तुमची उपकरणे वापरतील तेवढी तुमची Bargaining power (महत्त्व) जास्त. दुसरे म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या ह्या क्षेत्रातील वर्चस्वाला आव्हान. इतरही अनेक फायदे होउ शकतात - गुगलच्याच इतर सेवांबरोबर अधिक चांगली जोडणी (Integration), वापरकर्त्यांच्या सवयी वगैरेंचे अचूक ज्ञान (Usage patterns), इतर सेवादात्यांना एकतर गुगलशी जुळवून घ्या कीवा नामशेष व्हा असा संदेश (Implicit threat) वगैरे वगैरे...
मला वैयक्तिकरित्या उत्सुकता आहे ती दोन गोष्टींबद्दल - एक म्हणजे ही 'क्रोम' प्रणाली Linux वर आधारित असणारे आहे आणि मुक्त-स्त्रोत - म्हणजे हे सर्व त्यांनी कसे केले हे बघायला मिळेल आणि दुसरे म्हणजे त्यांनी जाहिर केल्याप्रमाणे संपूर्णपणे नवे बाह्य रुपडे (new user interface). सध्याच Linux मधे Gnome आणि KDE असे दोन सुंदर पर्याय मिळतायेत - त्यात अजून एकाची भर पडणारे - म्हणजे आमच्यासारख्या 'फुकट्या' लोकांची चांदीच की :)
गुगलसमोर माझ्यामते प्रमुख आव्हाने दोन आहेत - एक म्हणजे हार्डवेअर संलग्नता (compatibility) आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे मूळ (संगणक) निर्माणकर्त्यांची (OEM) ही प्रणाली लोकांपर्यंत पोचवण्याची इच्छा आणि तयारी. आत्ताच Asus, Lenovo, Acer वगैरे मंडळी 'नेटबुक्स' वर खुशीने फक्त XP देतायत - अगदी एखाद्याने मागितलेच तर Linux मिळते तर आता अजून क्रोम कुठून देणार ?
पण एकंदरीत 'फुकट्यां' साठी चांगले दिवस येणार असे दिसतेय - अर्थात गुगल त्याची किंमत कशी वसूल करेल ही भीती आहेच !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment