Thursday, November 22, 2007

"ती"

हे काही व्यक्तिचित्र नव्हे तर ह्या आहेत प्रकट झालेल्या भावना. ’ती’ कोण, नाव गाव काय असे प्रश्ण इथे गौण आहेत. थोड्याफ़ार प्रयत्नाने कोणालाही ह्यातले ’गुप्त’ details कळू शकतिल. पण ते उघड झाले तरी बिघडत काहीच नाही. माझ्या ह्या भावना प्रामाणिक आहेत ना एवढेच महत्त्वाचे.

तशी तिची आणि माझी ओळख उशिरानेच झाली. ती एक प्रसिद्ध लेखिका असली तरी मी त्या लिखाणाच्या वाटेला कधीच गेलो नव्हतो. म्हणजे तेव्हाचे माझे वय आणि आवडी बघता तसे काही पुस्तक उचलणे मी शक्यच नव्हते. लेखनाबरोबरच तिने स्त्रियांचे काही उपक्रम, आकाशवाणी आणि दूरदर्शन वरील काही कार्यक्रमात सहभाग दिला होता.


इथे एका स्नेह्याकडे गप्पांचा कार्यक्रम होता तेव्हा तिच्याशी पहिली भेट. तिच्या पतीबरोबर आलेली ती. पहिल्या भेटीतच एक हसरेपणा जाणवला तिच्या व्यक्तिमत्वात पण त्यापलिकडे काहीच नाही. तिचे यजमान म्हणजे दिसायला अगदी युरोपियन साहेब. उंच, गोरे, घारे आणि विचारांत एक प्रकारचा ठामपणा. म्हणजे हटवादीपणा नव्हे तर आपण काय बोलतो आहोत ह्याची पूर्ण जाणिव.


कशी कोण जाणे गप्पांची गाडी पु. लं. वर येउन पोचली आणि तीच्या यजमानांनी एक विधान केले " पु. लं. ना काही मी विचारवंत वगैरे मानत नाही....". झालं. आमच्या पु. ल. प्रेमाला पहिली ठेच बसली. त्यावेळी वयाची एवढी परिपक्वता नव्हती आणि त्यांच्या स्वभावाशीही परिचय नव्हता. मी माझ्या (नेहेमीच्या) सवयीने उसळून त्यांना म्हणालो "कशावरुन.....". बहुतेक एखाद्या व्यक्तीची अशी प्रतिक्रिया त्यांना अपेक्षितच असावी. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कटुता न निर्माण होता चर्चा पुढे चालू राहीली. त्यावेळी ती आतमधे गृहस्वामिनीबरोबर स्वैपाकचे बघत होती. म्हणून तिची मते कळू शकली नाहीत. पण त्या दिवशीच्या गप्पांमधून त्या उभयतांशी वैयक्तिक परिचय होण्याइतपत मैत्री झाली.

पुढे तिच्या संदर्भात अधिक माहिती मिळत गेली. एका असाध्य आजाराशी तीने दिलेल्या यशस्वी सामन्याशी हकिकत कळल्यावर तर आदर आणि कुतूहल अधिकच वाढले. त्यात एका दिवशी तीच्या घरचे आम्हाला आणि त्या स्नेह्यांना बोलावणे आले. काही कारणामुळे स्नेही येउ शकत नव्हते म्हणुन मग आमच्याच मनमोकळ्या गप्पा झाल्या. लक्षात आले - व्यक्तिमत्व जबरदस्त आहे, अर्थात यजमानही तोडीसतोड होते. पण तरी एक प्रकारची ऋजुता होती दोघांच्याही वागण्या बोलण्यात. ते दोघे केव्हा आमचे ’काका मावशी’ झाले ते कळलेच नाही.

त्या दिवशीच्या भेटीने ऋणानुबंध जुळले त्याला अजून एक (स्वार्थी) कारण म्हणजे - तीच्या कडे असलेला असंख्य पुस्तकांचा साठा. मराठी इंग्रजी दोन्ही पण मी लगेच त्यातली काही मराठी पुस्तके उचलून आणली. अतिशय वेगवेगळ्या विषयांची पुस्तके - म्हणजे लेखक, विषय, प्रकाशन साल - नेमके नाव महिती नसेल तर मिळूही शकणार नाहीत अशी. प्रविण पाटकरांचे ’सति’, सदा कर्‍हाड्यांचे "जेव्हा मी जात चोरली होती", एक समिक्षे वरचे पुस्तक. (’सति’ बद्दल वेगळा लेख लिहावा इतके वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे ते...). माझ्या आत्तापर्यंतच्या चाकोरीबद्ध वाचनाला एक वेगळीच दिशा, दृष्टी मिळाली. ह्यातली बरीच पुस्तके तिला प्रत्यक्ष लेखकांनी भेट म्हणून, अभिप्रायार्थ, स्वाक्षरी करुन दिलेली होती. तिच्याबरोबर आपले जुळणार ह्याची खुण गाठ तिथेच पक्की झाली.

(क्रमशः)

1 comment:

ऋयाम said...

नमस्कार..

चान्गले लिहीले आहे..
"जमल्यास" ब्लोग वर प्रोफ़ाईल अपडेट करावी ही विनन्ती.

कोणत्या माणसाचा ब्लोग वाचतो आहोत हे कळायला मदत होते, इतकच...

धन्यवाद.